पुनर्विवाह - काळाची गरज
१) इतिहास : ऐतिहासिक काळात पूर्वी पुरुष हे अनेक विवाह करायचे, काही वेळेस एका राज्याशी सुसंबंध प्रस्थापित करण्यासाठी दुसरा राजा हा त्या राज्याच्या राजकन्येशी विवाह करायचा. असे अनेक विवाह राजे करायचे. तसेच लढाईमध्ये खूप पुरुष मृत्यूमुखी पडायचे, त्यामुळे पुरुषांची संख्या महिलेच्या तुलनेत कमी असायची. त्यावेळी बहुविवाह पध्दत असायची तशाच इतरही प्रथा होत्या.
२) आधुनिक काळ : आधुनिक काळ येईपर्यंत त्या सर्व प्रथा हळूहळू बंद करण्यात आल्या, त्यावर कायदे व सुधारणा झाल्या. आता पूर्वीसारख्या लढाया होत नसल्याने पुरुष मृत्यूचे प्रमाण कमी आहे. लिंग गुणोत्तर हे जवळ जवळ समान होत आहे, आता बहुविवाह पध्दत राहिली नाही. पूर्वी कमी वयात मुलींची लग्ने व्हायची; त्यावेळी नवरा हा तिच्यापेक्षा दुप्पट/तिप्पट वयाचा असायचा. त्यामुळे त्याच्या मृत्युवेळी पत्नीचे वय तरुण असायचे, त्यातच केशकपन, सतीप्रथा, यांचाही पगडा होताच तसेच विधवा पुनर्विवाहास मान्यता नसे. त्यामुळे तरुण वयात विधवा झालेल्या महिलांचे आयुष्य कायम अंधारमय व्हायचे. नंतर अनेक समाज सुधारकांनी सामाजिक प्रबोधन केले आणि समाजातील सर्व अनिष्ट प्रथा बंद पडल्या. त्यावर कायदे तयार करण्यात आले. सतीप्रथा, केशवपन या प्रथा बंद झाल्या. महिला सक्षमी करणावर भर दिला गेला, मग महिलांनाही समान अधिकार प्राप्त झाले,
३) आज : आता तो काळ राहिला नाही, आज महिला पुरुषांच्या बरोबरीने प्रगती करीत आहेत; परंतु विधवा महिलांचा प्रश्न हा अजूनही तसाच आहे. पुरुषाची पत्नी मयत झाल्यास त्याचा पुनर्विवाह घडवला जातो, परंतु तरुण वयात विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्विवाहाच्या बाबतीत समाज अजूनही संकुचित विचार करतो, असे मला वाटते. प्रत्यक्षात तसे दिसूनही येते. तरुण वयात विधवा झालेल्या महिलांचे आयुष्य याच संकुचित विचार सरणीमध्ये गडद अंधारमय झाले आहे. काही प्रमाणात विधवा पुनर्विवाह केले जातात, परंतु ग्रामीण भारतात याबाबत सुधारणा होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी लोकांनी व समाजाने संकुचित विचारसरणी सोडून देऊन चौकटी बाहेर विचार करणे व ओपन माईंडेड होणे अत्यंत आवश्यक आहे. हल्ली दारू व इतर व्यसने, हदयविकार व इतर विकार व आजार यामुळे पुरुषांमध्ये अकाली मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पत्नीच्या मृत्यूनंतर पुरुष दुसर्या स्त्रीशी विवाह करतात, परंतु तरुण वयात पतीचा मृत्यू झाल्यास विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचे प्रमाण अत्यल्पच आहे.
४) सुनिता - एक दुर्दैवी महिला : माझ्या ऐकण्यात एक घटना आली. सुनिता नावाच्या एका मुलीचा पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणार्या मुलाशी विवाह झाला होता, लग्नानंतर एक वर्षांनंतर ती गर्भवती झाली; परंतु त्यावेळी तिच्या पतीचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला, वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी पहिले मुल पोटात असताना ती विधवा झाली. आता तिचं उर्वरित आयुष्य (किमान ५० वर्षे) कसं काढणार? हा मोठा गंभीर प्रश्न समोर उभा राहिलाय. ही तर माझ्या ऐकिवण्यात आलेली गोष्ट आहे. हल्ली महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात अशा अनेक दुर्दैवी गोष्टी घडू लागल्या आहेत,तरुण विधवा महिलांच्या आयुष्याचा पुनर्विकास करण्यासाठी पुनर्विवाह ही काळाची गरज बनली आहे.
५ ) काळाची गरज : महाराष्ट्रात विधवा महिलांचे प्रमाण अधिक आहे. अपघात, कोरोना विकार याप्रमाणेच शेतकरी बांधवांच्या आत्महत्यामुळे पुरुष मृत्युचे प्रमाण वाढले आहे. यात काही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या दोन दशकात सुमारे ३ लाख शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तर देशभरात विधवा महिलांची संख्या ४.५ कोटीहून अधिक आहे. संविधानाने महिलांना समान हक्क दिले आहेत; ग्रामीण भागात ३/४ महिला शेतीवर अवलंबून आहेत, परंतु त्यापैकी १३% महिलांच्याच नावे त्यांच्या पतीच्या जमिनी आहेत, नाहीतर इतरांच्या जमिनी त्यांच्या नावे न होता त्यांच्या मुलांच्या नावे होतात. शासन अशा महिलांना न्याय देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, परंतु हे केवळ शासकीय पातळीवरच मर्यादित राहत नाही तर समाजात गावोगावी, खेड्यापाड्यात याबाबत जनजागृती होणे ही काळाची गरज आहे; तरुण विधवांच्या पुनर्विवाहाबद्दल योग्य पावले उचलली गेली पाहिजेत. नाहीतर अनेक जणी वाईट वाकडी पावले उचलून अनेक गंभीर प्रश्न उदभवू शकतात. त्यामुळे याबाबतीत सुधारणा होणे आणि संकुचित सामाजिक दृष्टिकोन बदलणे अत्यंत आवश्यक आहे.
६) वाईट गोष्टी : ज्या महिलेच्या पतीचा अकाली मृत्यू होतो व त्या समाजात जर पुनर्विवाहाला मान्यता नसेल तर वाकडे पाऊल पडणे, नैराश्य, आत्महत्या अश्या घटना घडतात. विधवा बहिणीला भाऊ व भावजय उपकार म्हणून भिकाऱ्यासारखी वागणूक देतात. समाज अश्या महिलेकडे भक्ष म्हणून गिधाडा सारखं नजर टाकतो. असे वाईट जीवन जगण्यापेक्षा पुनर्विवाह खूप चांगला पर्याय आहे.
लेखक: डॉ. प्रकाश भोसले
-------------------------------------
मराठा सोयरीक संस्था
संपर्क कार्यालय: वैष्णवी कॉम्प्लेक्स, भिस्तबाग चौक, जगदंब क्लॉथ समोर, पाईपलाईन रोड. अहमदनगर- ४१४००१
पुणे शाखा: कान्हूर पठार पतसंस्थेच्या वर, पुणे-नगर हायवे टच, चंदननगर, पुणे.
आम्हाला फॉलो करा
आणि हो, ही पोस्ट जरूर शेअर करावी.